महिला सशक्तिकरण हे आरोग्याच्या दिशेने ठाम पावले - डॉ. कल्पना गुलवाडे
डॉ. कल्पना गुलवाडे यांनी अध्यक्षपद स्वीकारले
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 21 एप्रिल 2025) -
चंद्रपूर जिल्हा स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ संघटनेच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी डॉ. कल्पना गुलवाडे यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळाचा प्रारंभ एक सामाजिक व आरोग्यदायी दृष्टीकोनातून करण्यात आला आहे. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख व प्राध्यापिका डॉ. अलका पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मनीषा घाटे यांनी स्वागतपर भाषण केले. संघटनेच्या मागील दोन वर्षांचा कारभार डॉ. मनीषा वासाडे यांनी सादर करत एक अनुशासित आणि कार्यक्षम कालावधी दाखवून दिला. डॉ. नगीना नायडू यांनी कोषाध्यक्ष म्हणून आपले अनुभव मांडले, तर डॉ. ऋचा पोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महिला आरोग्यावर भर
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कल्पना गुलवाडे यांनी “माझे आरोग्य माझ्या हाती” हे ब्रीदवाक्य मांडत महिलांच्या आरोग्यविषयी जागरूकतेची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, “स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यावी. वजन, रक्तदाब, रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिनची नियमित माहिती ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर तपासणी व योग्य उपचारांमुळे महिलांचे आयुष्य अधिक निरोगी होऊ शकते.” या कार्यक्रमात वणी येथील ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुलभा मुंजे यांना संघटनेतर्फे लाइफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या दीर्घकालीन वैद्यकीय सेवा, योगदान आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी केलेल्या कार्याचे सर्व स्तरांवर कौतुक झाले.
नवीन कार्यकारिणी जाहीर
संघटनेची नवीन कार्यकारिणी -
- अध्यक्ष – डॉ. कल्पना गुलवाडे
- सचिव – डॉ. ऋचा पोडे
- कोषाध्यक्ष – डॉ. श्वेता मानवटकर
- उपाध्यक्षा – डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. समृद्धी आइंचवार, डॉ. ऋजुता मुंदडा, डॉ. पूनम नगराळे
- सहसचिव – डॉ. शुभांगी वासाडे, डॉ. प्रियांका पालीवाल, डॉ. शिल्पा नाईक, डॉ. अनुप बांगडे, डॉ. दिपाली मुसळे
- क्लिनिकल सचिव – डॉ. प्रिया शिंदे
- सांस्कृतिक सचिव – डॉ. मोनिका कोतपल्लीवार
- मार्गदर्शक – डॉ. कीर्ती साने
कार्यक्रमास IMA चे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, अध्यक्ष डॉ. संजय घाटे, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, तसेच डॉ. राजीव देवेकर, डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. किरण देशपांडे, डॉ. राजलक्ष्मी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ पदग्रहणाचा नव्हे, तर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि महिलांच्या आरोग्य उन्नतीसाठीच्या कटिबद्धतेचा प्रतीक ठरला. नव्या कार्यकारिणीकडून जिल्ह्यातील महिला आरोग्यासाठी नवकल्पना, उपक्रम व समाजाभिमुख कृतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हि सुद्धा बातमी वाचा (बातमी वाचण्याकरिता हेडिंगवर टच करा )
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.