आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ डिसेंबर २०२५) -
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत आयोजित तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रमशाळा किरमिरी यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विज्ञान प्रदर्शनीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित या भव्य उपक्रमात नागपूर विभागातील सर्व प्रकल्पांमधून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रत्येकी दोन अशा एकूण 41 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रनिंग, हँडबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विभागीय विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यात आला.
या विज्ञान प्रदर्शनीमध्ये स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रमशाळा किरमिरी येथील अन्न कचरा व्यवस्थापन या विषयावरील प्रतिकृतीने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला असून पर्यावरणपूरक संकल्पनेमुळे तिचे विशेष कौतुक करण्यात आले. हा पुरस्कार अप्पर आयुक्त आयुषी सिंह आणि प्रकल्प अधिकारी राचेलवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.
अन्न कचरा व्यवस्थापन ही प्रतिकृती विद्यार्थी सुमित प्रमोद आलाम यांनी सादर केली होती. या प्रतिकृतीसाठी शिक्षक प्रमोद साळवे यांनी मार्गदर्शन केले. अन्न नासाडीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, त्यातून होणारे पर्यावरण प्रदूषण आणि त्यावर करता येणाऱ्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती या प्रतिकृतीतून मांडण्यात आली होती. शिक्षक प्रमोद साळवे हे नेहमीच आपल्या शाळेत परसबाग, जैविक शेती यांसारखे उपक्रम राबवत असतात. विविध क्षेत्रातील प्रयोगशील कामातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून आदिवासी आश्रमशाळेमध्येही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
विद्यार्थी सुमित प्रमोद आलाम आणि शिक्षक प्रमोद साळवे यांच्या या यशाबद्दल शाळा, पालक, शिक्षकवर्ग तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही अशाच उपक्रमांतून आदिवासी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#ScienceExhibition #TribalEducation #SwamiVivekanandAshramSchool #EcoFriendlyIdeas #FoodWasteManagement #NagpurDivision #Chandrapur #StudentAchievement #EnvironmentalAwareness #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.