वाघाच्या हल्ल्यात गाईचा बछडा ठार, गाय गंभीर जखमी
आमचा विदर्भ - चंद्रपूर (दि. १६ डिसेंबर २०२५) -
माना रोड–इरई नदी परिसरात वाघाचा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली असून या हल्ल्यात गाईचा बछडा ठार झाला आहे तर गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माना रोड येथील इरई नदी परिसरात गुरे चारत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याची ही घटना घडली. वाघाने गाईच्या बछड्यावर झडप घालून त्यास जागीच ठार केले. हल्ल्यादरम्यान गायही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक पशुपालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती प्रभागातील रहिवासी राजू गजर यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल शेंडे यांना दिली. माहिती मिळताच अमोल शेंडे यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत परिस्थितीची गंभीरता अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. सामाजिक कार्यकर्ते अमोल शेंडे यांनी वनविभागाचे आरएफओ नायगमकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार वनरक्षक प्रदीप कोडापे आणि वनमजूर जलील शेख यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत पाहणी केली. घटनास्थळी आवश्यक पंचनामा करण्यात आला असून संबंधित कागदपत्रे शासनाकडे मदत व भरपाईसाठी पाठवण्यात आली आहेत.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात वाघाचा संचार असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले आहे. पंचनाम्यानंतर बाधित पशुधनधारकास तात्काळ भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही वनविभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अमोल शेंडे यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे. विशेषतः पहाटे आणि सायंकाळच्या वेळी नदी परिसरात किंवा मोकळ्या जागी जाणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास किमान चार ते पाच जणांनी एकत्र फिरावे आणि सुरक्षिततेसाठी काठी सोबत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्थानिक नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असून वनविभाग व प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येतील, असा निर्धार अमोल शेंडे यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या वन्यप्राणी संचारामुळे मानवी वस्तीत निर्माण होणारा धोका लक्षात घेता प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
#TigerAttack #WildlifeAlert #Manarod #IraiRiver #ForestDepartment #PublicSafety #AnimalAttack #ChandrapurNews #WildlifeConflict #StayAlert #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.