पूर्व विदर्भासाठी नवजीवन; २८० कोटींच्या कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १५ डिसेंबर २०२५) –
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून साकारत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयामुळे दुर्गम व आदिवासी भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणार असून हे रुग्णालय हजारो कर्करुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करत पत्रात नमूद केले आहे की, मानवसेवा, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रभावी संगम असलेले हे रुग्णालय राज्याच्या आरोग्य धोरणाला पूरक आहे. अद्ययावत आरोग्य सुविधा केवळ महानगरांपुरत्या मर्यादित न राहता त्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, या भूमिकेचा हा प्रकल्प उत्तम नमुना आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चंद्रपूर येथील कॅन्सर रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संमती दर्शवली. त्यानंतर शासनाने मंजुरी प्रदान करत या रुग्णालयाचे अधिकृत नामकरण ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की, चंद्रपूर येथे साकारत असलेले हे कर्करोग रुग्णालय पूर्व विदर्भातील कर्करुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य शासन, जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेले हे रुग्णालय आरोग्य सेवेत नवा आदर्श निर्माण करेल. या रुग्णालयाच्या माध्यमातून येथील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णसेवेचा उच्च दर्जा राखतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिमाण देणारा २८० कोटी रुपयांचा १४० खाटांचा हा भव्य कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय आदिवासी, ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवदानाचे केंद्र ठरणार आहे.
कॅन्सर रुग्णालयासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा केला. १७ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २६ जून २०१८ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाला. आज हा प्रकल्प पूर्णत्वास येऊन जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. तळमजला व चार मजली, सुमारे एक लाख चौ.फुटांपेक्षा अधिक बांधकाम क्षेत्र असलेल्या या रुग्णालयात १४० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. दोन लीनियर अॅक्सेलरेटर, ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D व 4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे, केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा यांसारख्या सर्व सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मेडिकल कॉलेज, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, नवे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांची श्रेणीवृद्धी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे यांसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प साकारले गेले आहेत. या सर्व प्रयत्नांचा सर्वोच्च टप्पा म्हणून कॅन्सर रुग्णालयाची उभारणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. पूर्व विदर्भासाठी नवजीवनाचा आशादायी प्रकाश देणारा हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाची नोंद घेतली जात आहे.
#Chandrapur #CancerHospital #PanditDeendayalUpadhyay #HealthcareDevelopment #Vidarbha #PublicHealth #CancerCare #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #HopeForPatients #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.