Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: एकनाथ शिंदे 'धनुष्य बाणा'वर दावा करण्याच्या तयारीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकनाथ शिंदे 'धनुष्य बाणा'वर दावा करण्याच्या तयारीत आमदार, खासदारा नंतर आता नगरसेवकही शिंदेंच्या पाठिशी आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क मुं...
एकनाथ शिंदे 'धनुष्य बाणा'वर दावा करण्याच्या तयारीत
आमदार, खासदारा नंतर आता नगरसेवकही शिंदेंच्या पाठिशी
आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क
मुंबई -
बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी करणाऱ्या आणि त्यासाठी शिवसेनेला भगदाड पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता ४०० माजी नगरसेवक, खासदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची यादी तयार केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे 'धनुष्य बाणा'वर दावा करण्याच्या तयारीत असून त्यासाठी त्यांनी ही यादी तयार केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष संघटनेचे नेतृत्व कायम रहावे, यासाठी शिवसेनेनेही धडपड सुरु केली असून त्याबाबत शुक्रवारी सगळ्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरची तयारी म्हणून एकनाथ शिंदे यांच्या या डावाकडे पाहिले जात आहे. सत्तांतरानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ही यादी तयार केल्याचे म्हटले जात आहे. मोदींचा करिष्मा आणि उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने कल्याणचे खासदार आणि शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह अनेक खासदार शिंदे गटात सहभागी होतील. ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, नवी मुंबई, वसई विरार, पनवेल आणि पुणे, पिंपरी चिंचवड अशी ही यादी वाढणार आहे.

उद्धव ठाकरे आज पदाधिकाऱ्यांशी साधतील संवाद
शिवसेनेने आपली अधिक पडझड थांबविण्यासह पक्षाच्या नेतृत्वावर आपलीच मांड घट्ट रोवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे शुक्रवारी संवाद साधणार आहेत.

शिंदेंनी अद्याप पक्ष सोडला नाही
खरा शिवसेना पक्ष आपल्याकडेच असल्याचे दर्शविण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांनी अद्याप पक्ष सोडलेला नाही. तर बाळासाहेबांच्या विचारानुसार वाटचाल करीत असल्याचे ते म्हणत आहेत. त्यामुळे उद्या निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी शिंदे यांनी मागणी केल्यास पक्षातील कार्यकर्त्यांची मतेही त्यासाठी गृहित धरण्यात येतील. निवडणूक आयोगासाठी असलेल्या १९६८ च्या कायद्याचा आधार शिंदे घेण्याची शक्यता आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top