वन्यजीव व जनावरांच्या जीविताला धोका
प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. १४ जुलै २०२६) -
महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा (आंगणवाडी) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात येणारे कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य राजुरा तालुक्यातील चनाखा गावालगतच्या जंगल परिसरात बेकायदेशीरपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे साहित्य खाल्ल्यामुळे एका म्हशीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून आणखी दोन म्हशींसह काही जनावरे बेपत्ता असल्याने त्यांच्या जीविताबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि आंगणवाडीतील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहारातील कालबाह्य गहू, तांदूळ, चना, खिचडी मिक्स, तिखट, हळद तसेच अन्य साहित्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून चनाखा गावालगतच्या जंगलातील तलाव परिसरात अज्ञात व्यक्तींनी टाकून दिल्याचे समोर आले आहे.
या परिसरात गावातील जनावरे नियमितपणे चारण्यासाठी जात असतात. गेल्या दोन दिवसांपासून काही म्हशी व इतर जनावरे बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तलावाजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले. त्याच परिसरात एक म्हैस मृतावस्थेत दिसून आल्याने हे कालबाह्य साहित्य खाल्ल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे चनाखा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषी व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच मृत जनावराच्या मालकाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. मारोती वडस्कर यांची एक म्हैस मृतावस्थेत आढळून आली आहे. तर महादेव ठमके यांच्या दोन म्हशी अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय इतर काही ग्रामस्थांची जनावरेही अद्याप सापडलेली नसल्याने त्यांच्याही मृत्यूची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या तलाव परिसरात कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य फेकण्यात आले आहे, त्या भागात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. हे विषारी अथवा कालबाह्य अन्न वन्यप्राण्यांनी खाल्ल्यास त्यांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असून दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे नियत वनरक्षक मारोती चापले यांनी सांगितले.
या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) सौ.एस.डी. रामटेके यांनी, "या घटनेची मला माहिती नव्हती. असे कृत्य करणे अत्यंत चुकीचे आहे. संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल," असे स्पष्ट केले.
संपूर्ण प्रकरणामुळे आंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी असलेल्या पोषण आहाराच्या साठवणुकीची, विल्हेवाटीची आणि देखरेखीची यंत्रणा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#Rajura #RajuraNews #Chanakha #Chandrapur #ChandrapurNews #Anganwadi #PoshanAahar #ICDS #WomenAndChildDevelopment #ExpiredFood #AnimalDeath #ForestWildlife #MaharashtraNews #VidarbhaNews #BreakingNews #LocalNews #OurVidarbha #AmchaVidarbha #RoadToJustice #NewsUpdate

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.