उपजिल्हा रुग्णालयासमोर पुन्हा रक्तरंजित अपघात; एकुलत्या एक मुलाचा मृत्यू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 11 जुलै 2026) -
राजुरा शहरातील असिफाबाद रोडवरील शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी दुपारी सुमारे साडेचार वाजताच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने विरूर स्टेशन येथील युवक विशाल केशव जीवतोडे याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अवजड वाहनांवरील नियंत्रणाच्या अभावाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल केशव जीवतोडे हा MH - 34 /बीजे BJ 1133 क्रमांकाच्या दुचाकीने तहसील कार्यालयाकडून पंचायत समितीकडे जात होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या AK -63 / A - 6768 क्रमांकाच्या दहा चाकी कंटेनरने दुचाकीच्या हँडलला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की विशाल जीवतोडे हा कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडला. डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालकाने कंटेनरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पंचायत समिती परिसरात कंटेनर अडविला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला. राजुरा पोलिसांनी कंटेनर जप्त करून चालक कमलेश भोजराज गुर्जर वय 25, रा. नंदराई, राजस्थान याला अटक केली आहे. अपघाताची माहिती मिळताच शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
विशाल केशव जीवतोडे हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. विरूर स्टेशन येथे तो कॅटरिंग व्यवसाय करत होता. कामानिमित्त राजुरा येथे आलेल्या विशालवर काळाने घाला घातल्याने विरूर स्टेशन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा; आणखी किती बळी जाणार?
राजुरा शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्य मार्गावरील पथद्विभाजक, रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले गट्टू, अरुंद झालेला रस्ता, अनेक ठिकाणी बंद पडलेले स्ट्रीट लाईट आणि शहरातून सातत्याने सुरू असलेली अवजड वाहनांची वर्दळ यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, उपजिल्हा रुग्णालयासमोर अल्पावधीत घडलेला हा दुसरा गंभीर अपघात असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने वाहतूक नियोजन, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, अवजड वाहनांवर नियंत्रण, बंद स्ट्रीट लाईट त्वरित सुरू करणे आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कमानीलाही धडक; अतिरिक्त कारवाईची मागणी
अपघातानंतर पोलिसांनी जप्त केलेला कंटेनर तहसील कार्यालयाच्या मैदानात आणत असताना चालकाने प्रवेशद्वारावरील लोखंडी कमानीलाही जोरदार धडक दिल्याने ती कोसळली. या घटनेची स्वतंत्र नोंद होणार का आणि संबंधित चालकाविरुद्ध अतिरिक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Rajura #RajuraAccident #Chandrapur #VirurStation #RoadAccident #ContainerAccident #MaharashtraNews #MarathiNews #VidarbhaNews #RoadSafety #TrafficManagement #BreakingNews #RajuraPolice #ChandrapurNews #RoadSafetyAwareness #AccidentNews #LatestMarathiNews #VidarbhaBreaking #PublicSafety #JusticeForVictims #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.