तांत्रिक अटींमुळे रोजगार धोक्यात; निदेशकांनी शासनाकडे मागितला दिलासा
आमचा विदर्भ (वृत्तसेवा)
चंद्रपूर (दि. ०९ जुलै २०२६) -
राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषद शाळांमध्ये मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या क्रीडा, कला व कार्यानुभव निदेशकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी निदेशकांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, शिक्षणमंत्र्यांनी प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या ज्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे, अशा शाळांमध्ये सन २०१२ पासून क्रीडा, कला व कार्यानुभव निदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या निदेशकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक शाळांमधील पटसंख्या घटल्यामुळे तसेच शासनाच्या काही तांत्रिक अटींमुळे अनेक निदेशकांचा रोजगार धोक्यात आला असून, काहींची सेवा देखील बंद झाली आहे. याशिवाय सन २०१२ पासून पूर्णवेळ सेवा बजावत असूनही अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा निदेशकांनी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडली.
निदेशकांनी रोजगार संरक्षण, मानधनात वाढ, सेवेला स्थैर्य तसेच शासनाच्या तांत्रिक अटींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या सर्व मुद्द्यांवर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सविस्तर चर्चा करत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. या भेटीदरम्यान क्रीडा, कला व कार्यानुभव निदेशक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंदोजवार, अमोल आवारी, गणेश आकेवार तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि निदेशक उपस्थित होते.
#SportsDirector #ArtDirector #WorkExperienceDirector #EducationNews #DadajiBhuse #SchoolEducation #MaharashtraEducation #Chandrapur #ChandrapurNews #Rajura #RajuraNews #TeacherNews #EducationDepartment #VidarbhaNews #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.