आमचा विदर्भ - (वृत्तसेवा)
राजुरा (दिनांक २७ ऑगस्ट २०२६) -
नुकतेच MBBS पदवीचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करणारे नवोदित डॉक्टर चेतन अनंता गोखरे यांचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आज दुपारी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी अनंता गोसाईजी गोखरे यांच्या निवासस्थानी भेट देत डॉक्टर चेतन गोखरे यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी डॉक्टर चेतन गोखरे यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासमवेत केशव ठाकरे, आदर्श ग्रामपंचायत कळमना सरपंच व माऊली कृषी केंद्र संचालक नंदकिशोर वाढई, नितीन बामब्रटकर, दीपक शर्मा, नितीन मुसळे, राजू नारल्लावार अनंता गोखरे, मारोती गोखरे, संध्याताई गोखरे आणि खुशी गोखरे उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी अनंता गोखरे आणि मारोती गोखरे यांचे वडील स्वर्गीय गोसाईजी गोखरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय गोसाईजी गोखरे यांनी चुनाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना केलेल्या कार्यपद्धतीचा आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. स्वर्गीय गोसाईजी गोखरे यांच्या मायेची छाया, संस्कार आणि कष्ट यामुळेच आज कुटुंबातील पुढील पिढीने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले. मेहनत, संस्कार आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवोदित डॉक्टर चेतन गोखरे यांना शुभेच्छा देताना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ करिअर म्हणून न पाहता रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश दिला. उत्तम प्रकारे रुग्णांची सेवा करणे हीच ईश्वरीय सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीला डॉक्टरांचे एक स्मितहास्य, आत्मीयतेने केलेले मधुर संभाषण आणि विश्वास देणारा सकारात्मक दृष्टिकोन मोठा मानसिक आधार देऊ शकतो, असेही सुदर्शन निमकर यांनी स्पष्ट केले. रुग्णांचे मनोबल खच्ची न करता त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने संवाद साधणे हीदेखील वैद्यकीय सेवेत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर चेतन गोखरे यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजातील गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा देत त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या सत्कार सोहळ्यातून शिक्षण, मेहनत, संस्कार आणि समाजसेवेची सकारात्मक प्रेरणा देणारा संदेश देण्यात आला. डॉक्टर चेतन गोखरे यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
#DrChetanGokhre #ChetanGokhre #MBBS #MedicalSuccess #DoctorFelicitations #SudharshanNimkar #Rajura #Chunala #Kalammna #Vidarbha #Chandrapur #DoctorLife #MedicalService #PatientCare #Healthcare #RuralHealthcare #SuccessStory #Inspiration #EducationSuccess #SocialService #DoctorsOfMaharashtra #MaharashtraNews #VidarbhaNews #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.