पीक विमा हप्ता दरांबाबत मुख्यमंत्र्यांचे कृषी सचिवांना निर्देश
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १७ जुलै २०२६) -
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वाढीव पीक विमा हप्ता दरांमुळे होत असलेल्या आर्थिक भाराचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी सचिवांना संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, २८ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगाम २०२६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले पीक विमा हप्ता दर शेजारील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असल्याची बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. समान भौगोलिक परिस्थिती, हवामान, पर्जन्यमान आणि पीकपद्धती असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वाढीव आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे चंद्रपूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक विमा हप्त्याचा तातडीने फेरविचार करून त्यातील विसंगती दूर करावी आणि शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी दर लागू करावेत, अशी मागणी केली होती. तसेच सुधारित दर निश्चित होईपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात यावी, जेणेकरून कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, अशीही त्यांनी मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गंभीर दखल घेत कृषी सचिवांना तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. २८ जुलै रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विमा हप्ता दरातील विसंगती दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न शासनाच्या उच्चस्तरावर पोहोचला असून, आगामी बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील हजारो भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
#Chandrapurnews #CropInsurance #PikVima #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #DattatrayBharane #Farmers #Kharif2026 #MaharashtraFarmers #ChandrapurNews #Vidarbha #Agriculture #CropInsuranceScheme #FarmerJustice #BreakingNews #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.