२० जुलैला तहसील कार्यालयावर धडक
नीट पेपरफुटी, शिक्षणातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात संविधानिक लढा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १७ जुलै २०२६) -
नीट पेपरफुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ २० जुलै रोजी राजुरा येथे तहसील कार्यालयावर संविधानिक व शांततापूर्ण ‘शिक्षण वाचवा’ मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिक, युवक, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलन समितीने केले आहे.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी १६ जुलै रोजी संत तुकडोजी महाराज सभागृहात विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राजुरातून पाठिंबा देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
आंदोलन समितीने दिलेल्या माहितीनुसार, मोर्चाची सुरुवात संविधान चौकातून होईल. त्यानंतर गांधी चौक, जुने बसस्थानक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन करून शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
या बैठकीस वामन साळवे, धीरज मेश्राम, दिनेश पारखी, सुभाष पावडे, अमोल राऊत, प्रयास कान्हेकर, शैलेश भरणे, सिद्धार्थ वाघमारे, धनराज उमरे, अनिल बाळसराफ, ॲड. मारोती कुरवटकर, दिलीप देरकर, अनंता ताजने, मेहमूद मूसा, विनोद बोबडे, गौरव रामटेके, धम्मदीप झाडे, शुभम खैरे, किसन बावणे, केशव बोठे, संतोष देरकर, रकीब रफी शेख, युवराज कातकर, रतन पचारे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय, स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना आळा, तसेच शिक्षणाचे व्यापारीकरण रोखण्यासाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. संविधानिक मार्गाने आणि शांततेच्या माध्यमातून शासनापर्यंत विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
#ShikshanVachva #EducationSave #NEETPaperLeak #EducationCorruption #StudentJustice #SonamWangchuk #RajuraNews #Chandrapur #Vidarbha #EducationReform #StudentProtest #MaharashtraNews #BreakingNews #SaveEducation #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.