राजुरा पंचायत समिती चौकातील अतिक्रमणामुळे बस प्रवाशांच्या जीवितास धोका
फुटपाथवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. १३ जुलै २०२६) -
राजुरा शहरातील पंचायत समिती चौक परिसरात रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संविधान चौकातील आसिफाबाद मार्ग आणि गडचांदूर मार्गावरील बसथांब्याच्या समोरच अतिक्रमण झाल्याने बसचालकांना नियोजित ठिकाणी बस उभी करता येत नसल्याने प्रवाशांना थेट रस्त्यावरच चढ-उतार करावा लागत आहे. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समिती चौकातील वाहतूक सिग्नल कार्यरत असतानाही बसचालकांना सिग्नल झोनमध्येच बस थांबवून प्रवासी चढवावे आणि उतरवावे लागत आहेत. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अचानक ब्रेक लागणे किंवा वाहनांची गर्दी वाढल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील विविध भागांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक रस्ते अरुंद झाले असून रस्त्यावरच करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उपजिल्हा रुग्णालयाजवळ अतिक्रमणामुळे यापूर्वी दोन भीषण अपघात झाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
संविधान चौकातील गडचांदूर मार्गावर काही चायनीज सेंटर चालकांनी फुटपाथवर शेकडो खुर्च्या टाकून संपूर्ण पदपथ व्यापल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. तसेच याबाबत कोणी विचारणा केल्यास संबंधितांकडून अपशब्द वापरले जात असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.
दररोज सकाळी आणि सायंकाळी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, ग्रामीण भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या बसथांब्यावर येतात. मात्र बसला थांबा मिळत नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या मधोमध उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची भीती कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधल्याचे सांगितले जात आहे. मात्र अतिक्रमण हटविण्यासंदर्भात अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या मते, बसथांब्यासमोरील अतिक्रमण तातडीने हटवून बससाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि नियमित अतिक्रमणविरोधी मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नगर परिषद, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून पंचायत समिती चौक व संविधान चौक परिसर अतिक्रमणमुक्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिक, प्रवासी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
#RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #Encroachment #RoadSafety #BusStand #Traffic #TrafficJam #MaharashtraNews #VidarbhaNews #PublicSafety #RoadAccident #NagrikSamasya #RajuraCity #BusPassengers #SaveLives #BreakingNews #AamchaVidarbha #LocalNews

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.