Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलीत कंत्राटी चालकांचे आर्थिक शोषण? कामगार आयुक्तांकडे निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कारवाई न झाल्यास वेकोली प्रशासनाविरोधात "मनसे स्टाईल" आंदोलनाचा इशारा आमचा विदर्भ - वृत्तसेवा चंद्रपूर (दि. १३ जुलै २०२६) -       ...
कारवाई न झाल्यास वेकोली प्रशासनाविरोधात "मनसे स्टाईल" आंदोलनाचा इशारा
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
चंद्रपूर (दि. १३ जुलै २०२६) -
        वेकोलीच्या माजरी क्षेत्रात कार्यरत कंत्राटी चारचाकी वाहनचालकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे तसेच पीडित कंत्राटी वाहनचालक उपस्थित होते.

        निवेदनानुसार, संबंधित कंत्राटदार शासन निर्णय (GR) व लागू वेतनदरानुसार वाहनचालकांच्या बँक खात्यात संपूर्ण वेतन जमा करतात. मात्र, वेतन जमा झाल्यानंतर वाहनचालकांवर दबाव टाकून त्यांच्याकडून मोठी रक्कम परत घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वाहनचालकांच्या हातात केवळ १० ते १२ हजार रुपयेच राहत असून उर्वरित रक्कम कंत्राटदार स्वतःकडे ठेवत असल्याचा दावा मनसे कामगार सेनेने निवेदनात केला आहे.
        मनसे कामगार सेनेच्या मते, हा प्रकार कामगारांच्या श्रमाचे आर्थिक शोषण असून कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर तातडीने दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात सर्व कंत्राटी वाहनचालकांच्या बँक व्यवहारांची, वेतन पावत्यांची, हजेरी नोंदवहीची, वेतन नोंदींची तसेच संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून कामगारांना त्यांचे संपूर्ण व कायदेशीर वेतन मिळत असल्याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली आहे.

        याशिवाय, आजपर्यंत कंत्राटी वाहनचालकांकडून कथितरीत्या वेतनातून परत घेण्यात आलेल्या रकमेची संपूर्ण गोळाबेरीज करून ती संबंधित कंत्राटदारांकडून वसूल करण्यात यावी आणि संबंधित वाहनचालकांना परत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने वेकोली प्रशासनाविरोधात तीव्र "मनसे स्टाईल" आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

        या निवेदनाच्या प्रती वेकोलीचे सीएमडी, नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच वेकोली माजरी क्षेत्राचे सीजीएम यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या कथित आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने सादर केलेल्या निवेदनातील असून, संबंधित कंत्राटदार किंवा वेकोली प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

#WCL #WesternCoalfields #Majri #MajriWCL #Chandrapur #ChandrapurNews #ContractWorkers #DriverSalary #LabourRights #MNS #MNSKamgarSena #AmanAndhewar #WageScam #CoalIndia #VidarbhaNews #MaharashtraNews #LabourNews #WorkersRights #BreakingNews #AamchaVidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top