स्ट्राँग रूम किती सुरक्षित? काँग्रेसची जॅमर लावण्याची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० डिसेंबर २०२५) -
राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचे राजकारण तापले असतानाच मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे EVM मशीनच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी थेट २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने जवळपास १९ दिवस स्ट्राँग रूममध्ये बंद ठेवण्यात आलेल्या EVM च्या सुरक्षेचा मुद्दा तीव्र झाला आहे.
देशभरात मत चोरी, EVM हॅकिंग आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपाबाबत वादंग उसळलेले असतानाच नागरिकांमध्ये EVM विषयी अविश्वासाची भावना वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने सॅटेलाइट, मोबाईल इंटरनेट किंवा बाह्य नेटवर्कद्वारे EVM हॅक होऊ शकते, अशी भीती मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्ट्राँग रूम परिसरात अत्याधुनिक सुरक्षा उपायांची गरज ओळखून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांना तातडीचे निवेदन सादर केले आहे. धोटे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, स्ट्राँग रूम परिसर पूर्णतः नेटवर्क-फ्री ठेवणे, कोणताही इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप रोखणे आणि जनतेचा मतदान प्रक्रियेवरील विश्वास टिकवून ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार स्ट्राँग रूममध्ये जॅमर बसवणे ही किमान आणि अत्यावश्यक उपाययोजना असल्याचे ते म्हणाले. धोटे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे कि, मतदारांचा EVM व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होऊ नये, यासाठी जॅमर बसवणे तात्काळ गरजेचे आहे. निवेदनानंतर नागरिकांतही या मागणीबाबत मोठी चर्चा सुरू असून निवडणूक विभागावर अधिक पारदर्शक व काटेकोर सुरक्षा देण्याचा दबाव वाढला आहे.
#RajuraElections #EVMConcerns #StrongRoomSecurity #ElectionTransparency #VoterTrust #CongressDemand #JamnerRequest #LocalBodyPolls #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.