वीस वर्षांची परंपरा उजाळवत चुनाळ्यात दिव्य ब्रम्होत्सव सोहळा सुरु
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ डिसेंबर २०२५) –
राजुरा तालुक्यातील चुनाळा या लहानशा आणि शांत गावात गेली वीस वर्षे भक्तीचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या श्री तिरूपती बालाजी मंदिराचा विसावा ब्रम्होत्सव सोहळा यंदा ४ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि सामुदायिक एकतेच्या भावनेने सुरू झाला आहे. मंदिराच्या स्थापनेपासून ते आजवर भक्तांनी जपलेली परंपरा, श्रद्धा आणि सेवाभाव या सर्वांचे दर्शन या सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे.
या ब्रम्होत्सवात अष्टोत्तर शत १०८ कलश अभिषेक, श्री बालाजी कल्याणोत्सव, श्री पुष्पयज्ञ तसेच सुदर्शन महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील प्रसिद्ध श्री शास्त्रपूर्ण पराशराम पट्टाभिरामाचार्यालू महाराज यांचे शिष्य श्री लक्ष्मणाचार्यालू महाराज यांच्या शुभहस्ते हे सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. भक्ति-श्रद्धेने भारलेले हे अनुष्ठान संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जेचे वलय निर्माण करत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थानाकडून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिसरातील अंध आणि गरजू रुग्णांना दृष्टीदान मिळावे म्हणून मेडीकल कॉलेज सेवाग्राम यांच्या सहकार्याने रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत मोतिबिंदू तपासणी व कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा अनोखा संगम या सोहळ्यात दिसून येत आहे.
ब्रम्होत्सवाचा शुभारंभ गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गावातील ग्रामसफाई आणि जनजागृती दिंडीने करण्यात आला. दिंडीत गावातील नागरिक, महिला मंडळे, बचत गटाच्या महिला, शिवाजी हायस्कूल, जिल्हा परिषद मराठी व तेलगू प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सकाळी १० वाजता रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर, रात्री ८ वाजता ध्वजारोहणम, नवग्रहपूजा तर त्यानंतर दत्तगुरू पदावली भजन मंडळ चुनाळा यांचे भजनाचे आयोजन करण्यात आले.
शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पंचामृत अभिषेक, अग्नीप्रतिष्ठा, सायं. ५ वाजता वधुवरनिर्णयम आणि रात्री ७ वाजता विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत आणली. शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी नवग्रह पूजा, श्रीनिवास कल्याणम (श्री बालाजी विवाह), दानशूर देणगीदारांचा सत्कार, १०८ कलशासह शोभायात्रा आणि सायंकाळी लक्ष्मीनारायण हवन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि. ७ डिसेंबर रोजी अवभृधोत्सवम्, चक्रस्नानम्, पूर्णाहुती सोहळा संपन्न होणार असून ११ वाजता पुसद येथील किर्तनकार ह.भ.प. पंकजपाल महाराज यांचे गोपालकाल्याचे प्रेरणादायी कीर्तन आयोजित आहे. दुपारी १ वाजता चुनाळा येथील सासरी गेलेल्या मुलींचा जावयांसह सत्कार, दुपारी ३ वाजता राजुरा येथील मनोज मिश्रा प्रस्तुत मिश्राजी भजन संध्या आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या संपूर्ण ब्रम्होत्सवाच्या आयोजनासाठी देवस्थानाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष सुरेश सारडा, सचिव वाय. राधाकृष्ण, सदस्य शामबाबु पुगलीया, शंकरराव पेद्दरवार, अशोक शहा, मनोज पावडे आणि सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#ChunalaBrahmotsav #TirupatiBalajiTemple #SpiritualFestival #DivineCelebration #CulturalPrograms #SocialInitiatives #DevotionalVibes #BlessingsAndFaith #ChandrapurNews #RajuraUpdates #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.