धार्मिक–सांस्कृतिक रंगांची उधळण; चुनाळ्यात उसळला भक्तांचा जनसमुदाय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०८ डिसेंबर २०२५) –
चुनाळा येथील श्री तिरूपती बालाजी देवस्थानात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ४ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत भव्य विसावा ब्रम्होत्सव सोहळा उत्साहात पार पडला. चार दिवस चाललेल्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे चुनाळा येथे भक्तांचा प्रचंड मेळा भरला. देवस्थानाच्या या उपक्रमांमध्ये सर्वांत महत्त्वाचे ठरले ते मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर. यात २९८ रूग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १०५ रूग्णांना शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी मिळणार आहे. चुनाळ्यासारख्या लहान गावात श्री तिरूपती बालाजी देवस्थानाची स्थापना झाल्यापासून दरवर्षी ब्रम्होत्सवाचे आयोजन सातत्याने होत आहे. यावर्षीच्या विसाव्या सोहळ्यालाही गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सोहळ्याची सुरुवात ४ डिसेंबरला ग्रामस्वच्छता अभियानाने झाली. या उपक्रमात गावातील नागरिक, श्री संप्रदाय सेवा समिती, शिवाजी विद्यालय, जिल्हा परिषद मराठी व तेलगू शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, कर्मचारी, तसेच महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते. गावात स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली. संध्याकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चुनाळा येथील विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सोहळ्यातील प्रमुख धार्मिक आकर्षण म्हणजे श्रीनिवास कल्याणम (श्री बालाजी विवाह सोहळा). हा कार्यक्रम विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील लक्ष्मणाचार्यालू महाराज यांच्या हस्ते मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. परिसरातील तेलुगू भाषिक भक्तांसह इतर भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या प्रसंगी देवस्थानास मदत करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यानंतर भगवान बालाजी, श्री लक्ष्मीदेवी व भूदेवी यांच्या उत्सवमूर्तीची १०८ कलशांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गावभर धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले होते. पुढे ह.भ.प. पंकजपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने गावकऱ्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन झाले.
देवस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मेडीकल कॉलेज सेवाग्राम यांच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत जवळपास २९८ जणांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी १०५ व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून देवस्थानाच्या वतीने त्यांना मोफत दृष्टी मिळणार आहे.
देवस्थानाच्या वतीने चुनाळा गावातील सासरी गेलेल्या मुलींचा जावयांसह सन्मान समारंभही घेण्यात आला. गतवर्षी विवाह झालेले नवदाम्पत्यांना शाल, श्रीफळ व ब्लाऊजपीस देऊन त्यांचा सत्कार देवस्थानाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला.
सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव वाय. राधाकृष्ण, शंकर पेहुरवार, सुरेश सारडा, सदस्य मनोज पावडे, अशोक शहा, श्री संप्रदाय सेवा समिती आणि समस्त चुनाळा ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
#TirupatiBalajiFestival #ChunalaBrahmotsav #DevotionAndCulture #EyeCareCamp #SocialService #BalajiDevastan #CulturalCelebration #SpiritualFestival #BlessingsForAll #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.