आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ डिसेंबर २०२५) -
राजुरा तालुक्यातील हरदोना (बुज) परिसरात गुरुवारी सायंकाळी भयंकर प्रकार उघडकीस आला. चंद्रप्रकाश हरदेव मेघवंशी व दुर्गा उर्फ जिया राजेश मेघवंशी यांच्यातील कथित प्रेमसंबंधांमुळे झालेल्या वादातून राजेश नारायणलाल मेघवंशी याचा तलवारीने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारदार सांगतात की ते राजेश नारायणलाल मेघवंशी यांचे चुलतभाऊ आहेत. राजेशचे लग्न दहा वर्षांपूर्वी दुर्गा उर्फ जिया हिच्याशी झाले होते. दोघांना दोन मुली व एक मुलगा आहे. राजेशचा मामा नारायण कटारिया हे 15 वर्षांपासून हरदोना (बुज) येथे बोरवेल ड्रिलिंग व ब्लास्टिंगचा व्यवसाय करत होते. कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला व त्यांचा मुलगा व्यवसाय सांभाळू लागला. येथे राजस्थानातील अनेक नातेवाईक व कामगार राहत होते. गत काही काळापासून चंद्रप्रकाश हरदेव मेघवंशी व राजेशची पत्नी दुर्गा उर्फ जिया यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. जवळपास सहा महिन्यांपूर्वी चंद्रप्रकाश मेघवंशीने दुर्गा उर्फ जिया हिला राजस्थानातून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्याबाबत राजेशने पोलिसांत तक्रारही केली होती. दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी ते दोघे मिळून राजस्थानहून नागपूर–चंद्रपूर–गडचांदूर मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले. 5 डिसेंबरला अंबुजा सिमेंट कंपनीजवळ ते दुर्गाच्या शोधासाठी गेले. संध्याकाळी अंदाजे 6.30 वाजता दोघे हरदोना (बुज) येथील मजुरांच्या राहत्या घराच्या दिशेने गेले. तेथे घरासमोर चंद्रप्रकाश मेघवंशी उभा दिसला. राजेशने त्याला पत्नीला का पळवून नेले, अशी विचारणा केली. दोघांमध्ये वाद चांगलाच पेटला. त्याच वेळी चंद्रप्रकाश मेघवंशीने शेजारच्या घराकडे पाहत दुर्गा उर्फ जिया हिला आवाज दिला. वरच्या मजल्यावरून दुर्गाने खाली तलवार फेकली. चंद्रप्रकाश मेघवंशीने ती उचलताच क्षणाचाही विलंब न लावता राजेशच्या डोक्यावर जोरदार वार केला. राजेश जागीच कोसळून गंभीर जखमी झाला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तो भीतीने पळून गेला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसोबत परतल्यावर राजेश मृत अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४,२५, बीएनएस २०२३, कलम ३(५), १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
#HardonaMurderCase #FamilyFeudTurnsFatal #RajeshMeghwanshi #CrimeReport #ChandrapurNews #MurderInvestigation #BreakingNews #CrimeInMaharashtra #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.