आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ डिसेंबर २०२५) -
देशपांडे वाडी मागील वाहणाऱ्या नाल्यालगत असलेल्या हिरव्यागार झाडांची अनधिकृत कत्तल सुरू असून या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत. देशपांडे वाडी आणि लक्ष्मीनगर येथील नागरिक मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना नाल्याच्या काठावरील मोठ्या झाडांच्या तुटलेल्या फांद्या, पडलेली पाने आणि झाडांची अचानक कमी झालेली संख्या याचे स्पष्ट पुरावे दिसले.
नाल्याच्या कडेला अनेक वर्षे उभ्या असलेल्या या हिरव्या झाडांवर विविध पक्ष्यांचा किलबिलाट असायचा. हा परिसर पक्ष्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच जिवंत असायचा. मात्र गेल्या काही दिवसांत झाडांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने, या परिसराचा नैसर्गिक आनंद आणि पक्षीजीवनाची लगबग थांबणार तर नाही ना, अशी गंभीर चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सध्या गुलाबी थंडी वाढलेली आहे आणि त्यातच गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गरम पाण्यासाठी किंवा घरगुती इंधन म्हणून काही व्यक्ती झाडांची कत्तल करीत असावेत, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे कृत्य केले जात असल्याचीही चर्चा आहे.
पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ही कृती केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर निसर्गासाठीही मोठा धोका असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. परिसरातील हिरवाई नष्ट झाल्यास नाल्याच्या कडेला मृदक्षरण वाढण्याची, तापमान वाढण्याची आणि पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी वन विभागाने संज्ञान घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिरवाईचे विनाशकारक खांदे रोखावेत, झाडे कापणाऱ्यांना ओळखून कठोर शिक्षा करावी, तसेच नाल्यालगतचा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा, याकरिता पर्यावरण प्रेमीं संस्था आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा अशीही मागणी समोर आली आहे.
#SaveTrees #StopTreeCutting #ProtectNature #GreenUnderThreat #EnvironmentAlert #SaveBirdHabitat #RajuraUpdates #ForestDeptAction #EcoCrisis #NatureMatters #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.