आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 07 डिसेंबर 2025) -
जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय जि.प. अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्मशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध 16 शाळांमधील एकूण 350 दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उदघाटन झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 5 टक्के दिव्यांग निधीमधून वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा ग्रामीण भागातील पात्र दिव्यांग नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे यांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016, दिव्यांग हक्क नियम 2017, महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 तसेच दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासन योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना दिली.
या क्रीडा स्पर्धांमध्ये अंध प्रवर्ग, मुकबधिर प्रवर्ग, मंतिमंद प्रवर्ग, अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 50 मीटर, 100 मीटर व 200 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक तसेच अंध प्रवर्गासाठी बुध्दीबळ अशा विविध खेळांमध्ये दमदार कामगिरी सादर केली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार बक्षीस देण्यात आले. तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. संचालन संजय पैचे यांनी केले तर आभार केशव दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना सांळुके, मच्छिंद्रनाथ धस, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी सोनवणे, कार्यकारी अधिकारी (बांधकाम) दिनदयाल मटाले, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाहीचे प्राचार्य गिरीश घायगुडे यांच्यासह अमोल चिटमलवार, आशा पडारे, मनिषा तन्नीवार, अजय बाबणे, कैलास उईके, निलेश पाझारे, उमेश घुलक्षे, अनिल तरारे तसेच शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, 3 डिसेंबर रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यातील 16 शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी समुह नृत्य, गोंडी नृत्य, अंध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गायन, मराठी गाणे अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
#DisabilityDay #InclusiveSports #ChandrapurEvents #DivyangEmpowerment #SportsForAll #SpecialStudents #InclusionMatters #AbilityBeyondDisability #MotivationForAll #CulturalProgram #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
.jpeg)
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.