उपसभापती संजय पावडे यांचे तहसीलदारांकडे निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (01 नोव्हेंबर 2025) -
राजुरा तालुक्यातील चुनाळा शिवारात मागील दोन महिन्यांतील अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरीप हंगामातील बहुतांश पिके नष्ट झाली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पन्न शिल्लक राहिलेले नाही. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने तिन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी नुकसानभरपाई देण्याचे आदेश जारी केले. शासनाने जिरायती जमिनींसाठी प्रती हेक्टर ८५०० रुपये आणि सिंचनाखालील जमिनींसाठी प्रती हेक्टर १६००० रुपये देण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते. परंतु चुनाळा गावातील ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी न करता, कार्यालयात बसूनच पंचनामे तयार केले. प्रत्यक्ष शेतात एकही पिक उरलेले नसताना पंचनाम्यात कुठे अर्धा एकर, कुठे एक एकर आणि जास्तीत जास्त दोन एकर नुकसानीचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यल्प नुकसानभरपाई मिळाली.
या शिवारात बऱ्याच जमिनी सिंचनाखाली असूनही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्याची नोंद न केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ज्या शेतकऱ्यांना हेक्टरमागे १६००० रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित होते, त्यांना केवळ ८५०० रुपये प्रति हेक्टर मिळाले. एकूण ४३१ शेतकऱ्यांना या चुकीच्या पंचनाम्याचा परिणाम सहन करावा लागला असून हजारो रुपयांचे अनुदान त्यांच्या हाती आले नाही.
या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय, राजुरा येथे धडक देत तहसीलदार राजुरा यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी या भेटीत शिवारातील प्रत्यक्ष नुकसानाची फेर पाहणी करून नव्याने पंचनामे करण्याची मागणी केली.
उपसभापती संजय पावडे यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करत स्पष्ट केले की, ग्रामविकास अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि योग्य पंचनामे करून शासनाकडे नवा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि महसूलमंत्री महाराष्ट्र शासन यांनाही पाठविण्यात आली आहे. पावडे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे कुणाच्याही निष्काळजीपणामुळे बुडू नयेत. प्रशासनाने तातडीने फेरपंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.”
#FarmersRights #ChandrapurNews #RajuraTaluka #CropLoss #FairCompensation #AgricultureJustice #SanjayPawde #FarmerProtest #FloodRelief #MaharashtraFarmers #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.