आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गोंडपिपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२५) -
तालुक्यातील गणेशपिपरी आणि चेकपिपरी परिसरात गेल्या आठवडाभरात सलग दोन नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा निषेध करत आज गणेशपिपरी येथे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) अध्यक्षा अॅड. कुंदाताई जेणेकर यांनी केले.
ग्रामस्थांनी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अॅड. जणेकर यांनी सांगितले की, “वाघ पकडण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. दोन निरपराध ग्रामस्थांचा जीव गेला, पण प्रशासन अजूनही निष्क्रिय आहे. जर वाघाला लवकर पकडून सुरक्षित स्थळी हलवले नाही, तर आम्ही शांत बसणार नाही.”
ग्रामस्थांचा आरोप आहे की, मागील काही महिन्यांपासून वाघांचा वावर या भागात वाढला असून, शेतकरी वर्ग दिवसा शेतात जाण्यास घाबरत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी कामगार आपल्या उपजीविकेवर परिणाम होण्याच्या भीतीत दिवस काढत आहेत. मोर्चामध्ये महिला, युवक आणि शेतकऱ्यांचा सहभाग मोठा होता. “वाघ जेरबंद करा!”, “पीडितांना न्याय द्या!”, “आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?” अशा घोषणा देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. या मोर्चात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता मेश्राम, सरपंच सुभाष कोलते, उपसरपंच विमल पाटील, माजी सदस्य संजय खवले, तसेच स्थानिक महिला मंडळांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.
“प्रशासनाने आता तरी जनतेच्या वेदना ऐकाव्यात. प्रत्येक मृत व्यक्तीमागे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारला असला तरी, जर वाघाला तात्काळ पकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”- अॅड. कुंदाताई जेणेकरजिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) अध्यक्षा
दरम्यान, वनविभागाचे पथक सध्या परिसरात गस्त वाढवत असून, वाघाला शोधण्यासाठी ट्रॅपिंग कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले आहेत. या संदर्भात विभागीय वनाधिकारी दिलीप दाते यांनी सांगितले की, “वाघ शोध मोहीम सुरू आहे, पथक सतत गस्त घालत आहे.” मात्र ग्रामस्थांनी या हालचालींना “उशिरा आलेली जाग” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या मते, एका आठवड्यात दोन निरपराध बळी जाणे हे केवळ वन्यजीव संघर्षाचे उदाहरण नाही, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक आहे. जोपर्यंत वाघाला जेरबंद करून पिडीत कुटुंबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत संतप्त नागरिक शांत बसणार नाहीत.
#ChandrapurNews #ChandrapurCity #Gondpipri #Ganeshpipri #TigerAttack #WildlifeConflict #SaveFarmers #advkundataijenekar #kundataijenekar #ChandrapurUpdates #Vidarbha #RuralSafety #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.