आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा उलगुलान विराट मोर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
आदिवासी आरक्षणावर डोळा ठेवून बनवलेल्या मागण्यांविरोधात आज (२७ सप्टेंबर) रोजी राजुरा येथे आरक्षण बचाव कृती समिती व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने उलगुलान विराट मोर्चा काढण्यात आला. कर्नल चौकातील भिवसन देवस्थानातून सुरू झालेला हा मोर्चा संविधान चौक, गडचांदूर मार्गे नाका क्र.३, गांधी चौक, नेहरू चौक मार्गे जात तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चाच्या सुरुवातीला आकाशात काळे ढग दाटले आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या झडीला न जुमानता हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक वेशभूषेत घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर पोहोचले. तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बापुराव मडावी यांचा जोरदार सज्जड दम
मोर्चाला संबोधित करताना आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक तथा आदिवासी नेते बापुराव मडावी यांनी स्पष्ट केले की, "आदिवासी आरक्षण हे आमचा संवैधानिक व न्यायिक हक्क आहे. बंजारा समाजाची आदिवासी आरक्षणाची मागणी ही बेकायदेशीर व तकलादू आहे. ते आता म्हणतात की आम्हाला आदिवासींच्या ताटातील ७% आरक्षण नको, पण आमच्यासारख्या सवलती देऊन ST-B करा. अरे, तुम्ही विमुक्त भटक्या जमातींचे ३% आरक्षण उपभोगत असतानाही आमचे घर फोडायला निघालात. आदिवासी आरक्षण हा गरीबी हटावचा पोटभरू कार्यक्रम नाही, त्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका."
त्यांनी पुढे इशारा दिला की, “आमच्या परंपरा, संस्कृती, रूढी आणि निसर्गप्रेमाशी बंजारा समाजाचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीस आदिवासी समाज कडाडून विरोध करीत राहील.”
आदिवासी आरक्षणाचा संदर्भ
भारताच्या संविधानानुसार अनुसूचित जमातींना त्यांच्या ऐतिहासिक अन्याय, शोषण व सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमातींना शिक्षण, नोकरी व राजकारणात ७% आरक्षण दिलेले आहे. बंजारा समाजास सध्या विमुक्त-भटक्या (VJNT) प्रवर्गात ३% आरक्षणाचा लाभ मिळतो. परंतु त्यांनी आदिवासी समाजासारख्या सुविधा व सवलती मिळाव्यात, अशी मागणी अलीकडेच सुरू केली आहे. याला आदिवासी समाजाने तीव्र विरोध दर्शवला असून हा प्रश्न राज्यभरात पेट घेत आहे.
या विराट मोर्चाला जेष्ठ आदिवासी नेते वाघुजी गेडाम, डॉ. मधुकर कोटनाके, बाबुराव मडावी, भिमराव पाटील मडावी, निलकंठराव कोरांगे, शामराव कोटनाके, गजानन पाटील जुमनाके, अश्विनी कोरांगे यांनी संबोधित केले. तसेच समिती अध्यक्ष विजयराव परचाके, परशुराम तोडसाम, नितीन सिडाम, राधाबाई आत्राम, कुंदाताई सलामे, सुभद्रा कोटनाके, अमृत आत्राम, संतोष कुळमेथे, महिपाल मडावी, दशरथ कुडमेथे, आनंद सिडाम, शालीक पेंदोर, रविंद्र आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, बल्लारपूर आदी तालुक्यांतील हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत वाजतगाजत उपस्थित होते.
मागण्या आणि इशारा
मोर्चात ठरविण्यात आले की,
- आदिवासी आरक्षणाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना जोरदार विरोध केला जाईल.
- आदिवासी समाजाचे संवैधानिक अधिकार अबाधित राहिले पाहिजेत.
- बंजारा समाजाला ST-B दर्जा देण्याच्या हालचाली त्वरित थांबवल्या पाहिजेत.
मोर्चात दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण शहर दणाणून गेले.
#TribalReservation #SaveSTReservation #RajuraMorcha #AdivasiRights #ConstitutionalJustice #STReservationNotForSale #TribalReservationRescueActionCommittee #WeStandForAdivasis #Tribalsociety #Seniortriballeader #WaghujiGedam #DrMadhukarKotnake #BaburaoMadavi #NilkanthraoKorange #ShamraoKotnake #GajananJumnake #rahasilofficerajura
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.