सहा लाखांचे उसनवार, अखेर जीवावर बेतला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
मूल / चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
आर्थिक व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची निर्घृण हत्या करून प्रेत नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना मूल पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपीस पोलीसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. टेकाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुनिल कालीदास गेडाम (६०) यांची हत्या झाल्याचे उघड झाले. माहितीनुसार, टेकाडी येथील किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद (२४) या युवकाने सुनिल गेडाम यांच्याकडून सहा लाख रुपये उसनवार घेतले होते. ती रक्कम परत करण्यास नकार दिल्याने वाद उफाळून आला.
शुक्रवार, रात्री सुमारे ७ वाजता सुनिल गेडाम व किस्मत सय्यद हे सावली मार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यानंतर आरोपी किस्मत सय्यद यांनी “महत्वाचे काम आहे” असे सांगून गेडाम यांना टेकाडीमार्गे एमआयडीसी रस्त्याने मूलकडे आणले. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान वाद विकोपाला जाऊन किस्मत सय्यद व त्याच्या काही साथीदारांनी लोखंडी सळईने सुनिल गेडाम यांच्या डोक्यावर वार करून ठार मारले. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे प्रेत मरेगाव-टेकाडी मार्गावरील नाल्यात फेकण्यात आले.
संशय आणि पोलीसांची कारवाई
सुनिल गेडाम घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. घरून बोलावून नेणारा किस्मत अली याच्यावर संशय आल्याने मुलगा पंकज गेडाम यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. दरम्यान आकापूरजवळील वळणावर सुनिल गेडाम यांची पल्सर मोटारसायकल क्रमांक MH34-AX-8323, मोबाईल, चष्मा व चप्पल आढळून आली. यानंतर पोलीसांनी संशयित किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली देत मृतदेह फेकल्याचे ठिकाणही दाखवले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
आरोपी किस्मत सय्यद हा गुरे खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असल्याने या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेवर उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी पुढील तपास करीत आहेत.
#MulMurderCase #ChandrapurCrime #JusticeForSunilGedam #MurderOverMoney #CrimeNews #VidarbhaUpdates #ChandrapurPolice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.