गायरान जमीन कंपनीला वाटपाचा वाद तीव्र; २ हजार नागरिकांचा रास्ता रोको
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना (दि. २९ सप्टेंबर २०२५) -
कोरपना तालुक्यातील सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीचे दालमिया सिमेंट कंपनीला वाटप करण्याच्या निर्णयाविरोधात २३ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांच्या मते, ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे गावकऱ्यांना विश्वासात न घेता मासिक सभेत गावाच्या हक्काच्या ५० एकर जमिनीचे ना हरकत प्रमाणपत्र सिमेंट कंपनीला दिले. हा निर्णय ग्रामस्थांच्या मते थेट भ्रष्टाचार असून, याविरोधात गावकऱ्यांनी निषेध नोंदविला आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी, कोरपना यांनी २६ सप्टेंबरला आदेश देऊन २ ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत हा मुद्दा चर्चेला घ्यावा असे स्पष्ट सांगितले होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने हा मुद्दा नाकारल्याने वाद आणखी चिघळला आहे. “गावातील शेकडो लोकांची मागणी असताना ग्रामसभा घेण्यास नकार का?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे तसेच माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. तरीही कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी हा विषय त्यांच्या अखत्यारीत नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत देत सांगोडा ग्रामपंचायतीतील अनियमिततेबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
मागण्या
- गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तात्काळ रद्द करावे
- ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी
- स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा
मुसळधार पावसातही उपोषण सुरूच असून, निवेदनं धुळखात पडल्यामुळेच हा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेसने प्रशासनावर दबाव वाढवत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी प्रशासन ठोस निर्णय टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन राजुरा–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. उपोषणकर्ते विठोबा बोंडे यांच्या प्रकृतीत सतत खालावाट होत असून, त्यांच्या जीवाला काही अनर्थ झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.
#ChandrapurProtest #KorapnaAndolan #FarmersRights #LandDispute #SayNoToCorruption #PublicOutrage #RightToLand #JusticeForFarmers #CongressSupport #RajuraHighwayBlock #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.