राजुरा-अमृतगडा मार्गावरील रस्त्यांची भयावह अवस्था
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ जुलै २०२५) –
राजुरा तालुक्यातील राजुरा ते अमृतगडा मार्गावरील आर्वी फाटा – कविटपेठ – चिंचोली दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय व चिंताजनक झाली आहे. जवळपास 7-8 महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे भरून काढण्याचे व दुरुस्तीचे काम प्रलंबित असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोल व विस्तीर्ण खड्डे पडले असून काही ठिकाणी तर इतकी खोलगट जागा झाली आहे की, मोठ्या वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन चाकी वाहनांसाठी तर हा रस्ता अतिशय धोकादायक बनला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या संदर्भात चिंचोली बु. येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास देठे यांनी आपल्या पत्रकार ग्रुपमार्फत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून दिले असून, तात्काळ रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. या मार्गावर दररोज शाळकरी मुले, कामगार, रुग्ण आणि सामान्य नागरिक प्रवास करतात. त्यामुळे रस्त्यांची ही अवस्था जनतेसाठी जीवघेणी ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.