वेकोलीने अधिग्रहित न केलेली १०१ हेक्टर जमीन तात्काळ संपादित करा
१५ दिवसांत निर्णय न झाल्यास पैनगंगा प्रकल्पासमोर आंदोलनाचा इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०९ जुलै २०२५) –
दि. २२ मार्च २०१५ रोजी कोरपना तहसील अंतर्गत मौजा विरुर गाडेगाव येथील ७२० हेक्टर जमीन वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड कडून संपादित करण्यात आली. यानंतर ग्रामस्थांचे पुनर्वसनही करण्यात आले. मात्र, उर्वरित १०१ हेक्टर जमीन अद्याप संपादित झालेली नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत ही जमीन तत्काळ संपादित करावी व सेक्शन ९ अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा १५ दिवसांत निर्णय न झाल्यास पैनगंगा प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत ग्रामस्थ शामराव बांदूरकर म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वेकोलीच्या काळ्या धुळीचा त्रास सहन करत आहोत. गावात आजही ५२ कुटुंबे वास्तव्यास असून सुमारे २०० ग्रामस्थ राहतात. सततच्या खाणकामामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, पिकांचे उत्पादन घटले आहे. शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. पैनगंगा नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणी शेतात साचते व पिके खराब होतात. याशिवाय वेकोलीमुळे वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून ग्रामस्थांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे."
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, “वेकोलीने त्वरित उर्वरित १०१ हेक्टर जमीन संपादित करून कलम ९ अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा आम्ही पैनगंगा प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू." पत्रकार परिषदेस शामराव बांदूरकर, पद्माकर ताजणे, कौशल्या ताजणे, सूरज वाघमारे, माधुरी ताजणे यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.