शेतात सराव, पुण्यात पदक – महेंद्रची यशोगाथा
जिवती तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा ठरला किक बॉक्सिंगचा हिरो!
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ११ जुलै २०२५) -
जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेडवाही गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील महेंद्र सोमू सिडाम याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने सराव करून पुणे येथील हिंजवाडीत पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी शेडवाही येथे जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सत्कार सोहळ्यास माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती निळकंठराव कोरांगे, माजी नगरसेवक मधुकर चिंचोलकर, शेतकरी नेते दत्ता राठोड, विनोद पवार, कर्माची कांबळे, ग्रामस्थ लिंबाराव सिडाम, रणजीत सिडाम, कोंडूजी सिडाम तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीत यशाची झेप!
महेंद्र सिडाम याच्याकडे सरावासाठी आवश्यक साधनसामग्री नव्हती. मात्र त्याने शेतातील झाडाला गाद्या बांधून किकबॅग तयार केली. प्रशिक्षक हेमंत चावके यांच्याशी फोनद्वारे सतत संपर्क ठेवून व्हिडीओच्या माध्यमातून तो प्रशिक्षण घेत राहिला. या कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत आपली चमक दाखवत कांस्यपदक मिळवले.
प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात राजुरा येथून
महेंद्र सन २०२३ मध्ये राजुरा तालुक्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, सिद्धेश्वर देवाडा येथे शिक्षण घेत होता. यावेळी प्राचार्या रूपाली बोरकर यांच्या पुढाकाराने शाळेत विद्यार्थ्यांना किक बॉक्सिंग व इतर खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. याच वेळी प्रशिक्षक हेमंत चावके यांच्याशी महेंद्रची भेट झाली आणि पुढील प्रवास सुरू झाला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.