खाजगीकरणाविरोधात वीज कर्मचारी संघटनेचा तीव्र इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ जुलै २०२५) -
राज्यातील वीज वितरणाचे खाजगीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरविंद कातकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ९ जुलै २०२५ रोजी बाबुपेठ येथील महावितरण कार्यालयासमोर एक दिवसाचा संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत अरविंद कातकर यांनी सांगितले की, समांतर वीज वितरण परवाना हा असंवैधानिक व बेकायदेशीर आहे. "ग्राहकांच्या हिताचे खोटे ढोंग करून महाराष्ट्र सरकार महावितरणसारख्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे," असे त्यांनी सांगितले.
महावितरण कंपनी राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारी कंपनी असून, ८०% महसूल शहरी भागातून येतो. सरकार अदानी आणि टोरेंटसारख्या खाजगी कंपन्यांना शहर व एमआयडीसी परिसर द्यायचा प्रयत्न करत आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होण्याचा आणि बीएसएनएलप्रमाणे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याचा धोका आहे.
खाजगी कंपन्यांनी जर वीजपुरवठा करायचाच असेल, तर त्यांनी ग्रामीण भागात करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली. याउलट, शहरातील नफा मिळणारे भाग खाजगी कंपन्यांना देऊन सरकारी कंपनीला दुर्बल बनवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील सर्व वीज कर्मचारी एकत्र येऊन ९ जुलै रोजी एकदिवसीय संपावर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच मागासवर्गीय वीज कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचाही निषेध नोंदवण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.