प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय! बल्लारशाह जीआरपी चौकीला पोलिस ठाणे बनवा!
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारशाह (दि. ११ जुलै २०२५) –
राज्याचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी १० जुलै रोजी राज्याच्या पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील जीआरपी चौकीला पोलिस ठाणे म्हणून दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीला महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे मुंबई येथील रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे यांनी २०२२ साली सुधीरभाऊंना पत्राद्वारे ही मागणी केली होती, त्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार करत ही मागणी पुढे नेली. त्यांचा दृढ पाठपुरावा आणि प्रशासनाशी सततचा संवाद यामुळे हा प्रस्ताव आता पोलिस महासंचालकांच्या स्तरावर पोहचला आहे. मंजुरीनंतर मंत्रालयाकडून याला अंतिम स्वीकृती मिळणार आहे.
वर्धा जीआरपी पोलिस स्टेशन ते बल्लारशाह जीआरपी आउट पोस्ट यामधील अंतर सुमारे १२० किलोमीटर आहे. बल्लारशाहमध्ये फक्त ७ मंजूर पदे असून, प्रचंड प्रवासी व मालवाहतुकीच्या दृष्टीने हे प्रमाण अपुरे ठरते. वेळेवर मदत मिळत नाही आणि गुन्हेगारी नियंत्रणात अडथळे येतात. बल्लारशाह हे एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, येथे दररोज सुमारे १३५ प्रवासी गाड्या, १२० मालगाड्या ये-जा करतात. तसेच, सुमारे ३ हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. हा भाग महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील रेल्वे मार्गावर असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. बल्लारशाह जीआरपी आउट पोस्टला पोलिस ठाण्यात रूपांतरित केल्यास, गुन्हेगारी नियंत्रण, प्रवाशांचे संरक्षण व रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.