‘आप’ची महाराष्ट्रात स्वबळावर वाटचाल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ११ जुलै २०२५) -
आम आदमी पार्टी येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे लढणार असून याची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. ही माहिती आपचे महाराष्ट्र प्रभारी व दिल्लीचे आमदार प्रकाश जारवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी निवडणुकांकरिता आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे जबाबदारी आ. जारवाल यांच्याकडे सोपवली असून, त्यानुसार राज्यभरात बैठकांचे आयोजन केले जात आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांसोबत या बैठका पार पडत असून, जनजागृती, जनसंपर्क, निवडणूक रणनीती व स्थानिक प्रश्नांवर आंदोलनात्मक कृती यावर भर दिला जात आहे.
चंद्रपूर महापालिकेतील अपयशी कारभारावर गंभीर आरोप
आ. जारवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महापालिकेच्या कामकाजावर टीका केली. त्यांनी सांगितले की, ४५० कोटींच्या अमृत कलश योजनेतून घराघरात पाणी पोहोचण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात अनेक घरांमध्ये पाणी पोहोचलेले नाही. सांडपाणी योजनेत घोटाळा, सरकारी निधीचा अपव्यय, भ्रष्टाचार, आणि नेत्यांच्या निकटवर्तीयांना दिलेल्या निविदा हे सर्व प्रकार उघड झाले आहेत. शहरातील सरकारी शाळांची जीर्ण अवस्था, खराब रस्ते, बंद स्थितीत असलेल्या रुग्णालयातील मशिनरी, अपुऱ्या मूलभूत सुविधा, तसेच कागदोपत्रीच राहिलेल्या योजना यावर त्यांनी सरकारला जाब विचारला.
"लोकशाही, पारदर्शकता व जनहितासाठीच ''आप'"
आपचे उमेदवार प्रत्येक जागेवर उभे राहून लोकशाही रक्षण, पारदर्शक प्रशासन आणि जनहितासाठी निःशंकपणे काम करतील, असा विश्वास आ. जारवाल यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेत आपचे नेते अजित फाटक, पदाधिकारी – भूषण ठाकूरकर, सुनील मुसळे, योगेश गोखरे, राजू कुडे, मयूर राईकवार, तबस्सुम शेख आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.