आमचा विदर्भ - राजेश अरोरा
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२५) –
चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांच्यावतीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत ही घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रेस प्रकाशन क्र. 2025/07/20 हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या जनसंपर्क विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे.
महत्त्वाचे बदल व सुविधा:
- सध्या कमी वापरात असलेले गुड्स शेड हे आता उच्चस्तरीय प्रवासी प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले जात आहे.
- मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूस नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम, त्यामुळे एकूण प्लॅटफॉर्म संख्या ८ होणार.
- दिव्यांग अनुकूल शौचालये, टॅक्टाइल पाथवे, कोच इंडिकेशन बोर्ड, IPIS (एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली) यासारख्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार.
- हे प्रकल्प बल्लारशाह स्थानकावरच्या ताणाला कमी करून, परिचालन कार्यक्षमता वाढविण्यास मदत करणार.
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) आणि दक्षिण मध्य रेल्वे (SCR) यांच्याशी मालगाड्यांचे आदान-प्रदान अधिक सुलभ होणार.
- मुंबई व पुण्यासाठी थेट गाड्यांच्या दीर्घकालीन मागणीला या सुविधांमुळे प्रतिसाद मिळण्याची शक्यता.
या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व वेळबद्ध होईल. यामुळे चंद्रपूर शहराच्या विकासाला नवे बळ मिळणार असून, उद्योग, पर्यटन व व्यापार यालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.