42 विज्ञान प्रतिकृतींनी सजला शाळेचा परिसर; विज्ञानाच्या दुनियेत विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 15 नोव्हेंबर 2025) -
जिल्हा परिषद (माध्यमिक व उच्च माध्यमिक) विद्यालय राजुरा येथे प्राचार्य किशोर वुईके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाल विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. देशभर शाळास्तर ते राष्ट्रीय पातळीपर्यंत साजरा होणाऱ्या या उपक्रमाला राजुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी, त्यांना प्रायोगिक शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचे खास आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मॉडेल्समुळे त्यांची संशोधन वृत्ती अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता तर्कशुद्ध, प्रयोगशील आणि नवोन्मेषी विचारसरणीकडे प्रवृत्त करणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे प्राचार्य किशोर वुईके यांनी सांगितले.
दोन गटांमध्ये एकूण 42 प्रतिकृतींची प्रभावी मांडणी
जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरा येथे झालेल्या या प्रदर्शनात वर्ग 6 ते 8 गटातून 20 प्रतिकृती तर वर्ग 9 ते 12 गटातून तब्बल 22 प्रतिकृतींनी सहभाग नोंदवला. कल्पक, नाविन्यपूर्ण आणि विषयानुरूप मांडणीने संपूर्ण सभागृह विज्ञानमय झाले.
तज्ज्ञांकडून काटेकोर मूल्यमापन
प्राध्यापक श्रीजा आणि प्राध्यापक रेश्मा मँडम यांनी सर्व प्रतिकृतींचे सखोल मूल्यमापन करून प्रत्येक गटातून पहिली तीन प्रतिकृती निवडल्या. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजकार्यात अग्रणी असलेल्या श्रीनिवास रेड्डी यांच्या मंडळाकडून आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या गणित व विज्ञान मंडळाकडून भेटवस्तू व प्रशस्तिपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशात गणित व विज्ञान विभागातील सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. प्रमाणपत्र लेखनासाठी अरुण मुसळे, कला शिक्षक सुनित लोहकरे, कार्यानुभव शिक्षक सोनुले यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण शिक्षकवृंदाने सांघिक कामगिरी करत हा उपक्रम भव्य यशस्वी केला. शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रतिकृतींची पाहणी करून सादरकर्त्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
#RajuraNews #ScienceExhibition #StudentTalent #InnovationKids #SchoolEvent #EducationUpdate #VidarbhaNews #ChandrapurUpdates #CreativeMinds #LearningByDoing #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.