वाढलेली रस्ता उंची बनली संकट; निचरा न झाल्याने गावकरी संतप्त
आमचा विदर्भ -
राजुरा (दि. २६ जून २०२५) -
महाराष्ट्र-तेलंगणा जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे वरूर रोड गावातील नागरिकांचे जिणे हराम झाले आहे. रस्त्याची उंची वाढवल्याने पावसाचे पाणी व सांडपाण्याचा निचरा न झाल्याने गावात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना चिखलात वाट काढावी लागत आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, संतप्त भावना उसळल्या
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणात माती टाकून रस्त्याची उंची वाढवली. मात्र, पावसाचे व सांडपाण्याचे व्यवस्थापन न केल्याने गावाच्या रस्त्यावर साचलेले पाणी दुर्गंधी पसरवत आहे. याबाबत गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सामूहिक आक्रोश आंदोलनही केले होते. त्या वेळी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी निचऱ्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महामार्ग अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासनांची खेळी केली, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
गावात रोज शेकडो विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढत असून, अनेक वेळा घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “जर एखादी अपघाताची घटना घडली किंवा आरोग्य बिघडले, तर संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असेल.” तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.