“शेतकरी मरत असताना सरकार IPL खेळवत आहे”
कर्जात बुडालेल्या प्रगतीशील शेतकऱ्याची आत्महत्या
आमचा विदर्भ - कृष्णा गेडाम
केळापूर (यवतमाळ) (दि. ०५ एप्रिल २०२५) –
शेतकरी आत्महत्या साठी कुप्रसिद्ध असलेल्या विदर्भात पुन्हा एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील महांडोळी येथील युवा व प्रगतीशील शेतकरी नकुल देविदास ठाकरे (वय ४०) यांनी काल सकाळी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. विदर्भात दररोज ४-५ व मराठवाड्यात ३-४ शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यात यवतमाळ जिल्ह्यात दररोज सरासरी २ शेतकऱ्यांचे मृत्यू नोंदवले जात आहेत. नकुल ठाकरे यांची आत्महत्या ही या क्रमात आणखी एक दुर्दैवी भर आहे. नकुल ठाकरे हे अत्यंत कष्टकरी व आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी होते, मात्र सातत्याने येणारी नापिकी, बाजारभावातील गडबड, कर्जाचा डोंगर आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते हतबल झाले.
किशोर तिवारी व अंकित नैताम यांची भेट:
शेतकरी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते किशोर तिवारी व कार्यकर्ते अंकित नैताम यांनी 3 मे रोजी त्यांच्या घरी जाऊन विधवा पत्नी मोनाली नकुल ठाकरे व त्यांच्या दोन चिमुरड्या मुलांची भेट घेतली. त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत, "हे शासन प्रगतीच्या गप्पा मारते, पण जमिनीवर शेतकरी अक्षरशः मरत आहेत," असा संतप्त आरोप केला.
प्रशासनाची अनुपस्थिती आणि उपेक्षा:
या भेटीदरम्यान कोणताही सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. किशोर तिवारी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "तहसीलदार हे मदतीऐवजी कारणं सांगतात आणि वाळू माफियांना पाठीशी घालतात, ही स्थिती सामान्य माणसाच्या उद्रेकासाठी पुरेशी आहे."
जनतेला आवाहन:
शेतकरी मरत असताना सरकार IPL खेळवत आहे, या दु:खी कुटुंबासाठी सरकारने पाठ फिरवली आहे, त्यामुळे आता समाजाने पुढे येऊन मोनाली ठाकरे आणि तिच्या मुलांना आधार द्यावा," असे आवाहन तिवारी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.