"कामगारांचा संघर्ष अटळ, परिवर्तन निश्चित" – प्रा. राम बाहेती यांची प्रखर भूमिका
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०४ मे २०२५) -
राजुरा तालुक्यातील सास्ती टाऊनशिप येथे आयोजित भव्य रॅली व जाहीर सभेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले. संयुक्त खदान मजदूर संघ, ठेकेदारी मजदूर युनियन, मराठा सेवा संघ, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रगती महिला मंडळ, किसान मजदूर संघटना, ग्रामप्रगती युवा मंच, बांधकाम कामगार संघटना व शेतकरी मित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मुख्य वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ किसान व कामगार नेते प्रा. राम बाहेती यांनी सांगितले की, "सध्या भांडवलशाही प्रवृत्ती कामगारांना पिचवत आहे, मात्र एक दिवस या श्रमनिष्ठ लोकांचे राज्य येईल आणि विषमता संपून जाईल." त्यांच्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, रामस्वामी पेरीयार यांच्यासह इतर नेत्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयुक्त खदान मजदूर संघाचे अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के होते. प्रमुख अतिथी म्हणून अरूण भालके व प्रा. आशिष देरकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक पुरुषोत्तम मोहुर्ले, संचालन दिलीप कनकुलवार व आभार प्रदर्शन श्रीपूरम रामलू यांनी केले.
सभेपुर्वी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या सास्ती टाऊनशिप परिसरात शेकडो कामगार, महिला आणि युवकांची भव्य रॅली काढण्यात आली. कार्यक्रमात श्रमसन्मान, कामगार हक्क आणि संघटित संघर्षाची गरज यावर जोर देण्यात आला. प्रा. देरकर यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करताना जमीन अधिग्रहणाच्या अघोषित धोरणांचा निषेध केला. अरुण भालके यांनी असंघटित कामगारांच्या दुर्लक्षित प्रश्नांकडे लक्ष वेधले. या कार्यक्रमात तुळशीराम भोजेकर, विनोद डेरकर, बी.आर. नातारकी, उषा बोबडे, शोभा कटकम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.