धुळीच्या ढगाखाली गडचांदूर परिसर!
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचांदूर (दि. ०४ मे २०२५)
गडचांदूर जवळ असलेल्या थुट्रा, गोपालपूर या गावांतील शेतकरी सध्या धुळीच्या प्रदूषणामुळे हवालदिल झाले आहेत. सिमेंट कंपनीकडून होणाऱ्या सततच्या वायू आणि धूळ प्रदूषणामुळे गावातील 30-35 शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले आहे. धुळीमुळे मजूर शेतीत काम करण्यास नकार देत आहेत, परिणामी शेतीचे काम ठप्प झाले आहे. या प्रदूषणाचा परिणाम फक्त शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर गावातील सौरऊर्जा प्रकल्प, पाणीपुरवठा योजना आणि नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गावातील टाक्यांना धूळ साचल्यामुळे सौर पंप बंद पडले असून, उन्हाळ्यात पाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, जवान मुले, वृद्ध नागरिक किडनी, हार्ट अटॅक, शुगर आणि बीपीसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. शेतीमधील मातीवर धुळीचे थर साचले असून नांगरणी व कास्त करणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी मागणी करूनही कोणीही स्थळी चौकशी केलेली नाही. परिणामी, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि सचिवांना निवेदन पाठवून न्यायाची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा सुरेश आत्राम, अनिल मडावी, मारोती मेश्राम, बिरशाव कोरांगे, वामन कोडापे, यांनी दिला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. याआधी झरीतील आरसीपीपीएल व अंबुजा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली होती. मात्र सिमेंट कंपनीला प्रशासनाचे मूक समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे. आदिवासी कुटूंबावर होणारा अन्याय प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या माध्यमातून दुर्लक्षामुळे होत असल्याने शेती उत्पादनासह आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व सचिव यांना पाठविलेल्या निवेदनातून केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सहसचिव आबीद अली यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.