Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुक्यातील पाण्याचा ठणठणाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यात पाण्याचा ठणठणाट शेकडो बंधारे कोरडे, जनावरांची पाण्यासाठी भटकंती आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) -    ...
राजुरा तालुक्यात पाण्याचा ठणठणाट
शेकडो बंधारे कोरडे, जनावरांची पाण्यासाठी भटकंती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) -
        यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने उच्चांक गाठला असून, राजुरा तालुक्यातील अनेक नदी, नाले, तलाव आणि शेकडो बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांसमोर तीव्र पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, धोपटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी असून, या खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्यामुळे भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यावर्षी बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्येही जलसाठा अत्यल्प राहिल्याने वर्धा नदीचे अर्ध्याहून अधिक पात्र कोरडे पडले आहे. त्याचा थेट फटका नदीकाठच्या गावांना बसत असून, शेतकरी, नागरिक आणि विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.

        दरवर्षीप्रमाणे यंदाही वेकोली परिसरातील तलाव, नाले आणि बंधारे वेळेआधीच कोरडे पडले असून, पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे की अनेक ठिकाणी विहिरी व हँडपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवून पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top