चंद्रपूरमध्ये IT पार्कसाठी भारतीय मजदूर संघाचा पुढाकार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 16 एप्रिल 2025) -
महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने, भारतीय मजदूर संघ, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संघाच्या शिष्टमंडळाने मा. मंत्री श्री शेलार यांना एक स्मरणिकास्वरूप पुस्तक भेट देत औपचारिक स्वागत केले.
या विशेष भेटीदरम्यान, विदर्भात उभारी घेत असलेल्या औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी चंद्रपूरमध्ये माहिती तंत्रज्ञान पार्क (IT पार्क) स्थापन करण्यात यावे, अशी ठाम मागणी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने केली. नागपूरच्या धर्तीवर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना संगणकीय, औद्योगिक आणि कुशल मनुष्यबळाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी IT पार्कसारखी भक्कम सुविधा अत्यंत गरजेची असल्याचे मत शिष्टमंडळाने मांडले. या निवेदनाच्या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके, माजी मंत्री व आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे जिल्हा मंत्री पवन ढवळे, सागर गादेवार, प्रज्वल गिलबिले, विशाल मेश्राम, रोशन बुरडकर, कृष्णा गोगुलवार यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विदर्भाच्या औद्योगिक नकाशावर चंद्रपूरचा ठसा उमटवण्यासाठी हे पाऊल निर्णायक ठरणार आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.