वेकोली कामगाराच्या घरात चोरी
आमचा विदर्भ - अनिल पांडेय
बल्लारपुर (दि. 25 एप्रिल 2025) -
बल्लारपूर शहरातील भगतसिंह वॉर्डात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडस दाखवत घरफोडी केली असून, वेकोली कामगार सतीश दमकोंडा यांच्या घरातून तब्बल चार तोळे सोनं आणि दहा तोळे चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार 22 एप्रिल रोजी सतीश दमकोंडा आपल्या साडू भावाच्या मुलीच्या साखरपुड्यानिमित्त तेलंगणातील पेदापल्ली येथे गेले होते. घर बंद असल्याने त्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. 24 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता परत आल्यावर बाहेरील कुलूप तसेच होते, मात्र घरातील मुख्य दरवाजा उघडा होता. घरात प्रवेश करताच आलमारी उघडी, सामान अस्ताव्यस्त आणि दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून, आज पंचनामा करून डॉग स्कॉडच्या मदतीने तपास सुरु करण्यात आला आहे. सध्या अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे चार लाख रुपये असल्याचे फिर्यादी सतीश दमकोंडा यांनी सांगितले. याआधीही विसापूर परिसरात चार घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांची चोरी केली होती. नागरिकांनी चोरट्याना लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.