Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तहसीलदार आणि तलाठी लाच प्रकरणी अडकले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तहसीलदार आणि तलाठी लाच प्रकरणी अडकले आमचा विदर्भ - अनिल पांडेय बल्लारपूर (दि. १ एप्रिल २०२५) -         बल्लारपूर तहसील कार्यालयातील तहसीलदार...
तहसीलदार आणि तलाठी लाच प्रकरणी अडकले
आमचा विदर्भ - अनिल पांडेय
बल्लारपूर (दि. १ एप्रिल २०२५) -
        बल्लारपूर तहसील कार्यालयातील तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड (वर्ग १) आणि कवडनई साजा येथील तलाठी सचिन रघुनाथ पुकळे (वर्ग ३) यांच्याविरुद्ध लाच मागणी प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) चंद्रपूरच्या पथकाने कारवाई केली आहे.

        तक्रारदार हे मौजा कोठारी, ता. बल्लारशाह येथील रहिवासी असून, ते बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय करतात. त्यांनी मौजा कवडजई येथे शेतीचा स्तर सुधारण्याचे काम सुरू केले होते. २३ मार्च २०२५ रोजी जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती व मुरूम काढत असताना तलाठी सचिन पुकळे आणि तहसीलदार अभय गायकवाड यांनी शेतात जाऊन परवानगी नसल्याचे सांगितले. शेतातील यंत्रसामग्री जप्त न करण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी दोघांनी एकूण २ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये दिल्यानंतर उर्वरित १ लाख रुपये देण्यासाठी तहसीलदार व तलाठी तगादा लावत होते. त्यामुळे तक्रारदाराने २६ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

सापळा आणि अटक :
        २६ मार्च रोजी झालेल्या पडताळणीत तलाठी पुकळे यांनी तहसीलदार गायकवाड यांच्या सांगण्यावरून ९० हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे १ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मात्र, तहसीलदार गायकवाड यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर बल्लारशाह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, तहसीलदार गायकवाड यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. तलाठी सचिन पुकळे हे सध्या रजेवर असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व त्यांच्या पथकाने पार पाडली.

नागरिकांना आवाहन :
       चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामाकरिता कायदेशीर शुल्काशिवाय लाच मागितल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top