Ram Navami Shobhayatra
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०१ एप्रिल २०२५) -
आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय सण उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने आज (दि.31) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी रामनवमी शोभायात्रेनिमित्त जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, शैलेश बागला आदी उपस्थित होते.
रामनवमी शोभायात्रेनिमित्त आयोजन समिती आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय रहावा, या उद्देशाने आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, रामनवमी हा उत्सव सर्व भाविकांच्या श्रध्देचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे यासाठी संपूर्ण सहकार्य राहील. अतिशय उत्साहात आणि आनंदात रामनवमी साजरी करावी. रॅलीची वेळ वाढवून मिळण्याबाबत विचार-विमर्श करून आणि नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. शासन - प्रशासनाच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात साज-या होणा-या सर्वधर्मीय सणांबाबत नुकतीच जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राहण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला आणि शांतता समितीच्या सदस्यांना सुचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, शहरातील रस्त्यांची कामे युध्दस्तरावर सुरू असून शोभायात्रेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मजबुत करून दिला जाईल. तसेच फॉगिंग मशीनने रस्त्यावरील धूळ खाली बसण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येईल. सोबतच रस्त्याची स्वच्छता आदी कामे मपनाने हाती घेतली आहेत.
यावेळी आयोजन समितीच्या सदस्यांनी देखील सुचना केल्या. बैठकीला विश्वास माधशेट्टीवार, रोडमल गहलोत, डॉ.गोपाल मुंधडा, अजय वैरागडे, जीतेन्द्र जोगड़, रविन्द्र गुरुनुले, अमित विश्वास, आशिष मुंधडा, प्रवीण खोब्रागडे, सुहास दानी, विजय डोमलवार, लखनसिंग चंदेल, विवेक होकम आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.