आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ३१ मार्च २०२५) -
स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत सहभागी असलेल्या कळमना (वा.) गावाची गट ग्रामपंचायत असलेले निंबाळा हे गाव अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विशेषतः उन्हाळा सुरू होताच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. निंबाळा हे राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले गाव आहे. उन्हाळ्यात गावातील बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडतात, परिणामी नळयोजना एक दिवस आड सुरू ठेवली जाते. मात्र, पाईपलाइन फुटल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून नळ योजना ठप्प आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले, नवीन नियुक्तीवर गावकऱ्यांचा आक्षेप
गावकऱ्यांच्या आरोपानुसार, पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अनेक महिन्यांपासून थांबले आहे, त्यामुळे त्यांनी आपले काम बंद केले आहे. यावर उपाय न करता ग्रामपंचायतीने कळमना येथील अनुभव नसलेल्या नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक केली, यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी शेतावर धाव!
पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे गावकऱ्यांना शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. अगदी कपडे धुण्यासाठीही बोअरवेल असलेल्या शेतांपर्यंत जावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष, ग्रामस्थ संतप्त
ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे गावकरी संतप्त असून, त्वरित नळयोजना सुरू करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे आणि नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्पुरती थांबवावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.