आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २८ एप्रिल २०२५) -
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय पर्यटकांनी आपला जीव गमावला. या भीषण घटनेच्या निषेधार्थ व मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजुरामधील २१ विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांनी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संविधान चौक, पंचायत समिती जवळ, एकत्र येऊन सामूहिक निषेध सभा व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी मेणबत्त्या पेटवून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सभेत बोलताना विविध संस्थांचे प्रतिनिधी म्हणाले की, "जगातील कोणताही धर्म दहशतवाद्यांना खतपाणी घालत नाही; मानवतेच्या विरोधात जाणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीचा तीव्र निषेध व्हायलाच हवा."
सभेत सहभाग घेतलेल्या २१ सामाजिक संस्थांमध्ये राजुरा व्यापारी असोसिएशन, राजुरा डॉक्टर असोसिएशन, जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण संस्था, पतंजली योग समिती, स्वरप्रिती कला अकादमी, गुरुदेव सेवा मंडळ, मॉर्निंग क्रिकेट क्लब, राजुरा बार असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, सृजन नागरिक मंच, स्वप्नपूर्ती वेलफेअर सोसायटी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, रावण सेना, तालुका पेन्शनर असोसिएशन, जेसीआय - रोटरी क्लब, रामबाग समिती, पत्रकार असोसिएशन, बांधकाम कामगार वेलफेअर असोसिएशन व जमात इस्लाम हिंद संस्था यांचा समावेश होता. दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी संघर्ष करण्याचे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले तसेच शासनाने कट्टरपंथी दहशतवाद्यांना ठेचून जहन्नुम पाठवावे अशी मागणीही करण्यात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.