"कामगार चळवळीचा झेंडा पुन्हा उंचावणार''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २८ एप्रिल २०२५) -
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा टाऊनशिप येथे १ मे २०२५ रोजी गुरुवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सायंकाळी ५.३० वाजता भव्य रॅलीचे आणि ७ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात औरंगाबादचे ज्येष्ठ कामगार नेते प्रा. राम बाहेती, परभणीच्या माधुरी क्षिरसागर व प्रा. आशिष डेरकर आदी मान्यवर कामगारांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत उत्सव समितीचे सचिव दिलीप कनकुलवार, रायलिंगु झुपाका, विनोद डेरकर, श्रीपूरम रामलू, समाधान लडके, दिनेश जावरे व साईनाथ ढवस यांनी दिली.
सास्ती टाऊनशिपमध्ये १९८६ पासून हा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. कामगार हक्क, कायदे व सध्याच्या परिस्थितीवर चर्चा घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. कामगार दिनाचा इतिहास १ मे १८८६ रोजीच्या शिकागोच्या लढ्याशी जोडलेला आहे, जेव्हा पाच लाख कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी औद्योगिक बंद पुकारला होता. या संघर्षात अनेक कामगार शहीद झाले आणि त्यांचं रक्तरंजित बलिदान आजही जगभर स्मरणात ठेवलं जातं.
यंदाच्या कामगार दिनाच्या कार्यक्रमात केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या चार कोड्सविषयी विशेष चर्चा होणार आहे. सरकारने शेतकरी व कामगार विरोधी धोरणे राबविल्याचा आरोप उपस्थित नेत्यांनी केला असून, या धोरणांचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सर्व वेकोलि कामगार व त्यांच्या परिवारांनी, तसेच राजुरा तालुक्यातील विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्सव समितीने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.