विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १ मे रोजी धरणे आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
विदर्भातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि अपेक्षित विकास साध्य करण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे अत्यावश्यक आहे, असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांच्या माहितीनुसार, १ मे रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी "निषेध दिन" म्हणून काळे फिती लावून आंदोलन केले जाईल.
अॅड. चटप म्हणाले, नागपूर करारानुसार विदर्भाला सिंचन, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, ऊर्जा, ग्रामविकास यामध्ये जो विकास अपेक्षित होता तो अद्याप झाला नाही. ६० हजार कोटींचा सिंचन अनुशेष व १५ हजार कोटींचा अन्य विभागीय अनुशेष अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे १३१ धरणे अपूर्ण राहिली व १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. राज्याचा आर्थिक डोलारा कोलमडला असून, महाराष्ट्र सरकारकडे महसुलापेक्षा अधिक खर्च आहे. त्यामुळे विदर्भासोबत अन्याय होत आहे. वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नक्षलवाद, प्रदूषण आणि कुपोषणासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे विदर्भ राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे. विदर्भातील प्रत्येक शेतकरी, शिक्षक, बेरोजगार, आणि विविध समाजघटकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, मुन्ना खोब्रागडे, मारोतराव बोथले, सुधीर सातपुते, अरुण सातपुते आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.