पोलिस विभाग महिलांच्या पाठीशी, आत्मविश्वासाने पुढे या - एपीआय निशा भूते
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १४ एप्रिल २०२५) -
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजुरा भूषण महियार गुंडेविया अभ्यासिकेत "महिला विषयक कायदे" या विषयावर माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजुरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा गजानन भूते यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना महिलांनी कोणताही अन्याय सहन न करता धाडसाने पुढे यावे, पोलीस विभाग नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे ठामपणे सांगितले.
एपीआय भूते यांनी आपल्या भाषणात समाजातील असहिष्णूता, महिलांवरील अन्याय व स्री शिक्षणाची गरज यावर सखोल प्रकाश टाकला. "महात्मा फुले यांनी पेटवलेली स्री शिक्षणाची ज्योत आता मशाल बनली असून, महिलांनी आत्मविश्वासाने आणि कायद्याच्या आधारे प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे," असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सारिका साबळे-जाधव होत्या. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना आपले ध्येय निश्चित ठेवून सकारात्मक दृष्टीकोन बाळगून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असे मार्गदर्शन केले. “सक्षम बना, शिक्षित बना आणि प्रगती साधा” असा संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिकाच्या अर्धांगिनी निशा मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्त्या संध्या बाळसराफ व निलीमा साळवे या व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा पत्रकार संघाचे सचिव अनिल बाळसराफ यांनी केले. संचालन अनुष्का बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन रोशनी टेकाम यांनी केले. एपीआय निशा भूते व डॉ. सारिका साबळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापिका शितल बनसोड, स्नेहा हंसकर, कृष्णाली बावणे, संजना वेलादी, वैष्णवी टेकाम, हर्षदा करमनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पायल कुंदलवार, जास्मीन शेख, प्रियंका धुर्वे, दिक्षा भोयर, लिना महानंद, इशिका लोखंडे, दुर्गा शेंडे, अमिषा मोरे यांच्यासह विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.