रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी जनतेचा एल्गार: चक्काजाम आंदोलन
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
राजुरा (दि. 03 एप्रिल 2025) -
वरुर, विरुर, धानोरा, चिंचोली आणि अंतरगाव ते राज्य मार्गापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी आज दिनांक 3 एप्रिल रोजी वरुर फाटा येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून धरणे व चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील गावांचे सरपंच, शेतकरी, युवकवर्ग आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाढले अपघात
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता नादुरुस्त व कमी रुंदीचा असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. ग्रामीण रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज लोकांना रस्त्यावर उतरावे लागले, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
रुग्णवाहिकांमध्येच प्रसूतीचे प्रकार
या मार्गावर अनेक दुर्घटना घडल्या असून, काही वेळा वेळेत रुग्णालय गाठता न आल्याने रुग्णवाहिकांमध्येच महिलांची प्रसूती झाली आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, महिला व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान पथनाट्य, भजन व निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी या मार्गाची तातडीने दुरुस्ती व रुंदीकरण करावे तसेच या मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा द्यावा, अशी जोरदार मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पुलावर आणि नायब तहसीलदार यांना निवेदन दिले.
या आंदोलनात सरपंच अनिल आलम, सौ. सुरेखा आत्राम, इंदिरा मेश्राम, मंदाताई किनाके, शंकर आश्रम, आनंदराव आत्राम, अजय रेड्डी, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, बापूजी धोटे, पंचायत समिती माजी सभापती कुंदाताई जेनेकर, सरिता रेड्डी, अविनाश रामटेके, प्रवीण चिडे, राजकुमार ठाकूर, अरुण सोमलकर, अजित सिंग, रवी चांदेकर, भास्कर श्रीराम, प्रीतीताई पवार, बबन ताकसांडे, अजित सिंग टाक, चेतन जयपूरकर, रामदास नकावार, प्रदीप बोबडे, प्रदीप बोटपल्ले, संतोष चौधरी, सुदर्शन जणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेच्या या तीव्र आंदोलनानंतर प्रशासन पुढे काय पाऊल उचलते, याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.