नियमभंग करणारे विद्यार्थी आणि निर्दोष चालक-वाहक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जानेवारी २०२६) -
राजुरा बसस्थानकावर सध्या अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून नियमांचे तीन तेरा वाजल्याने विद्यार्थ्यांच्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत शाळा व महाविद्यालये सुटल्यावर बसस्थानकावर प्रचंड गर्दी उसळत असून या गोंधळात कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राजुरा शहरातील बसस्थानकावर रोजच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येते. शासनाकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र रापम चंद्रपूर विभागात स्पष्टपणे दिसून येत आहे. मानव विकास योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत बसेस अपुऱ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत गजबजलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागत आहे.
बस कमी असल्याने बस येण्याआधीच फलाटावर मोठी धावपळ सुरू होते. सीट मिळविण्याच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थी बस फलाटावर उभे राहून चालत्या बसमध्ये दफ्तर व बॅगा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे धक्कादायक दृश्य दररोज पाहायला मिळते. या गोंधळात एखाद्या विद्यार्थ्याचा तोल जाऊन बसखाली पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकतो.
दुर्दैवाने असा अपघात घडल्यास रापमचे चालक व वाहक निर्दोष असतानाही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकते. नियमभंग विद्यार्थ्यांकडून होत असतानाही दोष मात्र चालक व वाहकांच्या माथी मारला जातो. परिणामी त्यांची नोकरी धोक्यात येते आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व सामाजिक संकटाला सामोरे जावे लागते.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत अध्यक्ष राजुरा विद्यार्थी संघटना प्रवीण मेकर्तीवार यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की सायंकाळी शाळा व महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत बसस्थानकावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. तसेच प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी किमान एक कर्मचारी बसस्थानकावर उपस्थित ठेवावा, जेणेकरून शिस्त राखली जाईल आणि अपघात टाळता येतील.
यासोबतच रापम प्रशासनाने विद्यार्थ्यांना पास देताना पासवर स्पष्ट सूचना नमूद कराव्यात. चालत्या बसमध्ये दफ्तर किंवा बॅगा टाकणे, नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा पास रद्द करण्यात येईल, अशी ठळक सूचना पासवर लिहावी. याबाबतची माहिती शाळा व महाविद्यालयांनाही देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. रापम, शाळा प्रशासन, पालक आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
#RajuraBusStand #StudentSafety #RoadSafety #MSRTC #PublicTransport #StudentIssues #BusStandChaos #SafetyFirst #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.