"माझे आरोग्य माझ्या हाती"
महिलांच्या आरोग्याच्या दिशेने ठरणार एक क्रांतिकारी पाऊल
चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व्यापक आरोग्य तपासणी मोहिमेला गती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ एप्रिल २०२५) -
महिलांच्या सशक्त आणि निरोगी आयुष्यासाठी महाराष्ट्र शासनाने "माझे आरोग्य माझ्या हाती" या महत्वाकांक्षी अभियानाची सुरुवात केली आहे. चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही महत्त्वपूर्ण बैठक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत महिलांच्या आरोग्याच्या प्राथमिक तपासण्या म्हणजे वजन, रक्तदाब, रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिन या चार तपासण्या संपूर्णपणे PPP (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि नागरी भागातील लाखो महिलांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक होता येणार आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी व्यापक सहभाग
या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार, आरोग्य आयुक्त, जिल्हाधिकारी, FOGSI (Federation of Obstetric and Gynaecological Societies of India)च्या प्रमुख महिला डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे आणि महिलांना वेळेवर निदान व उपचार मिळवून देणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट ठरेल.
भविष्यातील आरोग्यदृष्टीने मैलाचा दगड
या उपक्रमाद्वारे महिला त्यांच्या आरोग्याबाबत स्वतः जागरूक होतील, नियमित तपासणी होईल आणि संभाव्य आजारांचे निदान सुरुवातीलाच होईल. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.