आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि. 21 एप्रिल 2025) -
एल अँड टी कामगार संघ, आवारपूरचे महासचिव आणि श्रमिकांच्या हक्कासाठी लढणारे लोकप्रिय श्रमिक नेते साईनाथ बुचे (वय 64) यांचे आज सकाळी नागपूर येथील किंग्सवे रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. शवविच्छेदनगृह बंद असल्याने त्यांचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ पुढे ढकलण्यात आली असून, त्यांचा अंतिम संस्कार मंगळवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास बीबी येथे होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र मोहन बुचे यांनी दिली.
साईनाथ बुचे यांनी L&T सिमेंट लिमिटेड, आवारपूर पासून अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर पर्यंतच्या कालखंडात कामगारांच्या न्यायासाठी लढा दिला आणि अनेकांना त्यांच्या हक्काचे न्याय मिळवून दिले. अंदाजे एक महिन्यांपूर्वी बीबी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ पायी फिरण्यासाठी गेलेल्या साईनाथजींना एक मोटरसायकलने जोरदार धडक दिली होती. या अपघातानंतर त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि एल अँड टी कामगार संघाचे अध्यक्ष, माजी खासदार श्रमिक नेते नरेश पुगलिया यांच्या देखरेखीखाली दुसऱ्याच दिवशी त्यांना नागपूर येथील किंग्सवे रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या मेंदूचे दोन वेळा यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि अखेर सोमवार, 21 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या बातमीने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील हजारो कामगारांमध्ये शोककळा पसरली आहे. कामगार वर्तुळात त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.